दावोस - भारत आणि पाकिस्तान संबधीत महत्त्वाच्या काश्मीर मुद्द्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित 'वर्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये केले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान यावेळी चर्चा झाली. पाकिस्तान आणि अमेरिका दोन्ही देशांतील संबध अधिक दृढ झाल्याचे ट्रम्प यावेळी म्हणाले.
भारत- पाकिस्तान संबधीत काश्मीर मुद्द्यावरही चर्चा झाली, काश्मीरमध्ये काय चालू आहे, आम्ही पाहत आहोत, आणि यावर लक्ष ठेवून आहोत, असे ट्रम्प म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर येणार आहेत, त्याआधी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, अफगाणिस्तान आणि भारत आमच्या चर्चेचे महत्वाचे मुद्दे होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावरून मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव अनेक वेळा मांडला आहे, मात्र, काश्मीर प्रश्न दोन्ही देशांमधील वाद असून यामध्ये तिसरे कोणी पडण्यास भारताने कायम विरोध केला आहे.
पंतप्रधान मोदींनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला होता, असा डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी दावा केला होता, यावरून माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. परराष्ट्र खात्याने मोदींनी असे वक्तव्य केल्याचे वक्तव्य फेटाळले होते.
काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असल्याची कायमच भारताची भूमिका राहिली आहे. मात्र, पाकिस्तानकडून काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.