लंडन (यूके) : कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगातील अनेक देश आपापल्या आरोग्य सुविधांशी संघर्ष करताना दिसले. त्यामुळे संबंधित देशातील लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका नवीन अभ्यासानुसार, विलगीकरण कक्षातील केवळ एका विषाणू हॉटस्पॉटमुळे तो अवघ्या दहा तासात विलगीकरण कक्षाच्या जवळपास अर्ध्या पृष्ठभागापर्यंत पसरू शकतो, असा निष्कर्ष समोर आला आहे.
जर्नल ऑफ हॉस्पिटल इंफेक्शनमध्ये एका पत्रकाच्या स्वरूपात हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला. या अभ्यासाचा मुख्य हेतू कोरोना विषाणूला कारणीभूत असणारा सार्स-सीओव्ही-२ विषाणू रुग्णालयाच्या पृष्ठभागावर कसा पसरतो, हे शोधणे हा होता.
युकेतील युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटल (यूसीएल) आणि ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटल (जीओएसएच) च्या संशोधकांनी एका रुग्णालयातील बेडवर सोडलेल्या नमुना विषाणूचा डीएनए अवघ्या १० तासात त्या संबंधित विलगीकरण कक्षाच्या जवळपास अर्ध्या भागामध्ये पसरल्याचे नोंदवले आहे. तसेच हा विषाणू पुढचे किमान पाच दिवस तसाच कायम टिकून राहिल्याचेही सांगितले.
या प्रयोगासाठी थेट सार्स-सीओव्ही-२ विषाणूचा वापर करण्याऐवजी संशोधकांनी विषाणू संक्रमित वनस्पतीपासून डीएनएचा एक भाग कृत्रिमरित्या तयार केला. जो मानवांना संक्रमित करू शकत नाही. तसेच त्यांनी कोरोना बाधित रूग्णांच्या श्वसन यंत्रणेत सापडलेल्या सार्स-सीओव्ही-२ विषाणू प्रमाणेच समान तीव्रतेचा विषाणू एक मिलीलीटर पाण्यात सोडला.
तसेच संशोधकांनी विषाणूचे डीएनए मिसळलेले हे पाणी एका रुग्णालयातील बेडच्या हात ठेवण्याच्या जागेवर लावले. कारण अशा ठिकाणी रुग्णांकडून विषाणू संक्रमित होण्याचा धोका अधिक असतो. त्यानंतर पुढील पाच दिवसांमध्ये रुग्णालयाच्या वेगवेगळ्या ठिकाणाचे एकूण ४४ नमुने चाचणीसाठी घेण्यात आले.
१० तासानंतर संबंधित वॉर्डमध्ये ठेवलेल्या नमुना विषाणूचे अनुवांशिक घटक असणाऱ्या विषाणूंचा रुग्णालयातील ४१ टक्के पृष्ठभागावर प्रसार झाल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. या विषाणूचे आनुवंशिक घटक बेडच्या रेलपासून ते दाराच्या कडीपर्यंत, तर प्रतिक्षा गृहातील आर्मरेस्टपासून मुलांच्या खेळण्यांवर आणि पुस्तकांवर अशा सर्व ठिकाणी आढळले.
या अभ्यासानुसार तीन दिवसांपर्यंत विषाणू पसरण्याचे प्रमाण ५९ टक्क्यांपर्यंत वाढले. तर पाचव्या दिवशी विषाणू पसरण्याच्या वेगात घट होऊन ते ४१ टक्क्यांपर्यंत खाली आले.
“विषाणूच्या संक्रमणामध्ये पृष्ठभागाची भूमीका किती महत्त्वाची आहे. त्याचबरोबर हाताची स्वच्छता आणि साफसफाईचे पालन करणे किती आवश्यक आहे, याचे महत्त्व आमच्या अभ्यासाने अधोरेखित केले आहे,” असे युसीएलच्या लेना सिरिक यांनी सांगितले.
“आम्ही वापरलेला विषाणूचा नमुना निर्जंतुकीकरण करुन रुग्णालयातील एक विशिष्ट ठिकाणी लावला होता. मात्र रुग्णालयातील कर्मचारी, रूग्ण आणि भेट देणाऱ्या इतर व्यक्तींनी या पृष्ठभागाला स्पर्श केल्याने त्या विषाणूचा प्रसार झाला. एखाद्या व्यक्तीने अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने किंवा सार्क-सीओव्ही-२ विषाणू बाधित रुग्णाच्या शिंका किंवा खोकल्याच्या माध्यमातून हा विषाणू एकापेक्षा अधिक ठिकाणी पसरणे शक्य आहे,” असेही सिरिक यांनी सांगितले.
त्या रुग्णालयातील ज्या बेडवर तो नमुना विषाणू ठेवला होता, त्याच्या आसपासच्या उपाचार कक्षांसारख्या वैद्यकीय क्षेत्रांसहीत त्या बेडच्या जवळचे सर्व इतर बेड आणि खोल्यांमध्ये या विषाणूची चाचणी सकारात्मक आली असल्याचे संशोधकांनी सांगितले.
या प्रयोगाच्या तिसर्या दिवशी त्या रुग्णालय परिसरातील नमुना ठिकाणांपैकी ८६ टक्के ठिकाणांची चाचणी सकारात्मक आली. तर चौथ्या दिवशी त्या बेड जवळील ६० टक्के भागाची चाचणी सकारात्मक आल्याचेही त्यांनी सांगितले.
“खोकला किंवा शिंकांमुळे नाकातुन किंवा तोंडातुन बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे कोविड-१९ विषाणूचे संक्रमण लोकांना होऊ शकते,” असे युसीएलचे सह-अभ्यासक इलेन क्लॉटमॅन-ग्रीन यांनी सांगितले.
“अगदी याचप्रमाणे हे थेंब ज्या पृष्ठभागावर पडतात, त्या पृष्ठभागाच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली आणि त्यांनी त्यांच्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केल्याने ते संक्रमित होऊ शकतात,” असेही क्लॉटमॅन-ग्रीन यांनी सांगितले.
सार्स-सीओव्ही-२ प्रमाणेच संशोधकांनी वापरलेले नमुना विषाणू जंतुनाशकाचा वापर करुन किंवा साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवून ते विषाणू काढला जाऊ शकतो.
“आमचा हा अभ्यास म्हणजे खबरदारीचा एक महत्त्वपूर्ण संदेश आहे. ज्यामुळे आरोग्यसेवा कर्मचारी आणि हॉस्पिटलला भेटी देणारे इतर सर्व व्यक्ती स्वतःचा हात सतत स्वच्छ धुवून, पृष्ठभाग साफ करुन आणि वैयक्तिक संरक्षक उपकरणाचा (पीपीई) योग्य वापर करुन विषाणूचा प्रसार रोखू शकतात,” असेही क्लॉटमॅन-ग्रीन यांनी सांगितले.
सार्स-सीओव्ही-2 हा विषाणू खोकल्याच्या थेंबासारख्या शारीरिक द्रव्यामार्फत पसरला जातो. म्हणुन हा अभ्यास करताना विषाणूच्या डीएनएचा वापर पाण्यात केला आहे. नाकातील द्रव्यासारख्या इतर चिकट द्रवपदार्थाच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार अधिक सहज होत असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.