फ्रान्स - प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचं व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याने फ्रान्समध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. या व्यंगचित्रामुळे आपल्या भावना दुखावल्याचा आरोप मुस्लीम समाजाने केला होता. याच पार्श्वभूमीवर एका माथेफिरूने फ्रान्सच्या नाईस शहरामध्ये असलेल्या चर्चमध्ये घूसून चाकूने तिघांची हत्या केली होती. या प्रकरणातील तिसऱ्या संशयिताला आज अटक करण्यात आल्याची माहिती फ्रान्सच्या पोलिसांनी दिली आहे. हा संशयित हल्लेखोराचा चुलत भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या दोन महिन्यांत धार्मिक वादातून फ्रान्समध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. यामध्ये एका हल्लेखोराने नाईस शहरात असलेल्या चर्चमध्ये घूसून चाकूने वार करत तिघांची हत्या केली होती. या हल्ल्यावेळी त्याच्या एका हातात चाकू तर दुसऱ्या हातात कुराणाची प्रत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान व्यंगचित्र प्रकाशित झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक मुस्लीम देशांनी फ्रान्सच्या मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.