कोलंबो : श्रीलंकेच्या बंदरात आलेल्या एक्स-प्रेस पर्ल या बोटीला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. भारत आणि श्रीलंकेची पथके संयुक्तपणे ही आग शमवण्याचा प्रयत्न करत होते. तब्बल आठ दिवसांच्या अथक मेहनतीनंतर ही आग आटोक्यात आली आहे. भारतीय दूतावासाने ट्विट करत याबाबत माहिती दिली.
२० मे रोजी हे जहाज श्रीलंकेच्या कोलंबो बंदराजवळ आले होते. यावेळी या जहाजाला मोठी आग लागली. या जहाजामध्ये फिलिपाईन्स, चीन, रशिया आणि भारताचे काही कर्मचारी होते. या कार्गो शिपला आग लागल्यानंतर श्रीलंकेच्या नौदलाने तातडीने यातून २५ जणांना सुरक्षित बाहेर काढले होते. यामधील दोन भारतीय कर्मचारी काही प्रमाणात जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यापैकी एक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.
यानंतर श्रीलंकेकडून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरुच होते. मात्र त्यांना यश येत नसल्याचे पाहिल्यानंतर मंगळवारी (२५ मे) भारताचे एक पथकही तिथे मदतीला पोहोचले. भारताचे पथक पोहोचले नसते, तर तेव्हाच हे जहाज बुडून गेले असते. या जहाजावर सिंगापूरचा झेंडा होता. तसेच, यात १,४८६ कंटेनर होते.
एमईपीएने केली तक्रार..
दरम्यान, मरीन एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ऑथरिटीने (एमईपीए) या जहाजाचा कप्तान आणि त्याची मालक कंपनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या जहाजाला लागलेल्या आगीमुळे पर्यावरणाचे जे नुकसान झाले आहे, त्यासाठी या दोघांना जबाबदार ठरवून, त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार कोलंबो हार्बर पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे.