बीजिंग - कोरोनाच्या मुद्द्यावरून चीनचे नाव खराब करण्याच्या प्रयत्नांना कधीही यश मिळणार नाही, असे मत चीनच्या एका उच्च सरकारी समितीच्या प्रवक्त्याने मांडले आहे. गुओ वेईमिन असे या प्रवक्त्याचे नाव आहे. सीपीपीसीसी (चायनीज पीपल्स पॉलिटिकल कॉन्सल्टेलिव्ह कॉन्फरन्स) या राष्ट्रीय समितीचे ते प्रवक्ते आहेत.
काही देशांमधील राजकीय नेते हे कोरोनाबाबत आपल्या लोकांना चुकीची माहिती देत आहेत. लोकांचे या महामारीवरून लक्ष वळवण्यासाठी, किंवा मग आपल्या जबाबदाऱ्या दुसरीकडे ढकलण्यासाठी ते चीनला जबाबदार ठरवत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना कधीही यश मिळणार नाही, असे मत गुओ यांनी व्यक्त केले आहे.
सीपीपीसीसीच्या वार्षिक राष्ट्रीय संमेलनाच्या एक दिवस अगोदर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या परिषदेमध्ये दोन हजारांहून अधिक सदस्य एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करतील. त्यानंतर आपला अहवाल ते सरकारच्या वेगवेगळ्या विभागांना सादर करतील.
या महामारीमुळे जागतिक राजकारणामध्ये मोठे बदल झाले आहेत, मात्र चीन आपल्या आधीच्याच आंतरराष्ट्रीय धोरणांवर कायम राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : 'वंदे भारत मोहीम' : थायलंडमध्ये अडकलेले भारतीय आज येणार मायदेशी..