न्युयॉर्क - भारताने जम्मू काश्मीरचा विषेश दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानची आगपाखड सुरू आहे. या मुद्यावर आज (शुक्रवारी) संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये बंद दवाज्याआड चर्चा होणार आहे. काश्मीरमधील सद्य स्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
सकाळी १० वाजता गुप्त बैठक होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सदस्य असलेल्या चीनने काश्मीर मुद्यावर बैठक घेण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानचे परारष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेचे अध्यक्षा जोआना व्रोन्चीका यांना काश्मीर प्रश्नी तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती. तसे पत्र पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र परिषदेला लिहले होते.
काश्मीरप्रश्नी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतविरोधात आघाडी उघडली आहे. मात्र, आत्तापर्यंत एकाही देशाने पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे पाठिंबा दिला नाही. भारताच्या निर्णयामुळे काश्मीरसह आशिया खंडामधील शांतता धोक्यात येईल असा कांगावा पाकिस्तानने केला आहे.
भारताने ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घाईघाईत चीनचा दौरा केला होता. भारताच्या निर्णयाविरोधात पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. मात्र, उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा देण्याचे चीनेन टाळले.
काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. पाकिस्तानने यामध्ये पडण्याची गरज नाही. भारताने कोणत्याही सीमेचे उल्लंघन केलेले नाही, असे भारताने स्पष्ट केले. मात्र, पाकिस्तान भारताविरोधात गळर ओकतच आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्ध करण्याची धमकी दिली आहे.