बीजिंग - ‘जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन’ म्हणून 17 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी आंतराष्ट्रीय समुदायाला संबोधित केले. जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. त्यामुळे या संकटात गरीब लोकांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोरोनामुळे गरीब लोकांवर दुहेरी संकट आले आहे. गरीबांना कोरोनाची लागण होण्याचा जास्त धोका असतो. तर कोरोनाची लागण झाल्यास योग्य उपचार मिळत नाहीत. अधिकृत आकडेवारीनुसार 11.5 कोटी लोकांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. महामारी काळात गरीबीविरोधात लढण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
गरीबी मोजण्यासाठी केवळ उत्पन्न हा निकष महत्त्वाचा नसून पोषण, बालमृत्यू, शालेय शिक्षण, शाळेची उपस्थिती, स्वयंपाक इंधन, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, गृहनिर्माण व घरगुती मालमत्ता निकषांच्या आधारे गणना केली जाते. तसेच विकसनशील देशांत विकासाच्या वाढीबरोबरच गरीबी, उपासमार, असमानता, दारिद्र्य वाढत आहे. शिवाय कोरोना महामारीमुळे त्यात आणखी भरच पडली आहे, असेही त्यांनी सांगितले.