काबूल - अफगाणिस्तानातील सत्ता तालिबानच्या हाती गेली असून तेथील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या निर्वासन मोहिमेत हजारो अफगाण नागरिकांनी देश सोडला. मात्र, अमेरिकेची निर्वासन मोहीम संपल्यानंतर काही नागरिक खासगी विमानाने पलायन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तालिबानकडून अफगाण नागरिकांना घेऊन जाणारे चार खासगी विमानं रोखण्यात आली.
देश सोडून जाणारे नागरिक अफगाण होते. त्यांच्यापैकी अनेकांकडे व्हिसा किंवा पासपोर्ट नव्हता. ज्यामुळे त्यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली, असे अफगाणिस्तानच्या उत्तर भागातील शहर मजार-ए-शरीफमधील विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अफगाणिस्तानातून पळून जाणारे बहुतेक अफगाणी पाकिस्तान आणि इराणमध्ये आश्रय घेत असल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत हजारो अफगाण नागरिकांनी देश सोडला असून इतर देशांमध्ये निर्वासित म्हणून दाखल झाले आहेत. तर देश सोडणाऱ्यांची संख्या पाहता आता तालिबानने अफगाण नागरिकांना देश सोडून न जाण्याचा इशारा दिला आहे. आता कोणत्याही अफगाण नागरिकाला देश सोडून जाण्याची परवानगी देणार नसल्याचे तालिबानने म्हटले आहे.
हेही वाचा - तालिबानच्या क्रौर्याची परिसीमा, नातेवाईकांसमोर गर्भवती महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या