कोलंबो - श्रीलंकन सुरक्षा दले आणि शस्त्रधारी गटामध्ये झालेल्या चकमकीनंतर १५ मृतदेह ताब्यात घेण्यात आले. यात ६ लहान मुलांचा समावेश आहे. पूर्व श्रीलंकेतील कलमुनाई या शहरात शुक्रवारी ही घटना घडली. १५ मधील ६ जण संशयित दहशतवादी आहेत. २ किंवा अधिक संशयित दहशतवादी पळून गेल्याचे सांगण्यात आले आहे.
शुक्रवारी रात्री अम्पारा सैंतामारुतू येथे सुरक्षा रक्षकांनी छापा टाकला. यानंतर येथील शस्त्रधाऱ्यांनी स्फोट घडवून आणला. यानंतर गोळीबाराला सुरुवात झाली. मृतांमधील ६ संशयित दहशतवाद्यापैकी एकाचे नाव मोहम्मद नियाज असल्याचे समोर आले आहे. ते स्थानिक कट्टरतावादी संघटना नॅशनल सौहीद जमात या गटाच्या महत्त्वाचा सदस्य होता.
पहाटे या परिसरात १५ मृतदेह आढळून आले. याच शहरातील आणखी एका छाप्यामध्ये पोलिसांना इस्लामिक स्टेटचे झेंडे, जेलीग्नाईटच्या १५० कांड्या, हजारो स्टील पॅलेटस आणि ड्रोन कॅमेरा सापडल्या. या जप्त केल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. स्थानिक पोलिसांनी पूर्वेकडील कलमुनाई, चावालाकाडे, सम्मातुराई येथे पुढील सूचना मिळेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
शुक्रवारी १० जणांना अटक करण्यात आली. ईस्टर संडेला हा स्फोट घडवून आणल्यापासून आतापर्यंत ८० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या स्फोटांमध्ये २५३ लोक ठार झाले. तर, ५०० हून अधिक जखमी झाले. श्रीलंकेतील नागरी युद्धानंतरचा हा रक्तबंबाळ दिवस होता.