रियाद - सौदी अरेबियातील अरामको तेल कंपनीच्या दोन सेंटरवर ड्रोन हल्ला झाल्याची घटना घडली आहे. प्रथम आग लागल्याचे वृत्त होते. मात्र, ती आग ड्रोन हल्ल्यामुळे लागल्याचे नंतर स्पष्ट झाले. या कंपन्यांमधून प्रतिदिनी ५ लाख ७० हजार बॅरेल क्रुड ऑईलचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर ‘अबकॅक’ आणि ‘खुराइस’ येथील फॅसिलिटी सेंटर्सवर ड्रोन हल्ले करण्यात आल्याची माहिती सौदीच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली.
या हल्ल्यामुळे प्रतिदिनी होणारे ५ लाख ७० हजार बॅरेल क्रुड ऑईलचे उत्पादन थांबवण्यात आले आहे. येमेनच्या होतीस संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ड्रोन हल्ल्यामुळे दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू केला असल्याचे सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रे आणि युनायटेड किंगडम यांच्याकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. कंपनीचे हेड अमीन नासीर यांनी सांगितले की, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, मी सर्व बचाव पथकांचे आभार मानतो ज्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
गेल्या काही महिन्यांमध्ये क्रॉस-बॉर्डर क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने सौदी अरेबियाच्या एअर बेसवरही हल्ले करण्यात आले होते. मे महिन्यापासूनच आखाती क्षेत्रामध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. जून महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हवाई हल्ला करण्याची घोषणा केली होती. परंतु नंतर त्यांनी आपला निर्णय बदलला होता.