कोलंबो - अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ हे श्रीलंका दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी कोलंबोच्या सेंट अँथनी चर्चला भेट दिली. गेल्या वर्षी खिश्चन समाजासाठी अत्यंत पवित्र असलेल्या ईस्टर संडे दिवशीच श्रीलंकेतील चर्चमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला होता. माईक पॉम्पिओ यांनी बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
'सेंट अँथनी चर्चमध्ये आज श्रद्धांजली अर्पित केली. साखळी बॉम्बस्फोटामुळे सेंट अँथनी चर्चमध्ये पार्थनेसाठी आलेल्या अनेकांचा जीव गेला. हिंसक अतिरेकीपणाचा पराभव करण्यासाठी श्रीलंकेसह संपूर्ण जगासोबत अमेरिका उभी आहे', असे माईक पॉम्पिओ म्हणाले.
श्रीलंकेत कोलंबोतील चर्चमध्ये ईस्टर संडेदिवशी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटांमध्ये 258 ठार तर, 200हून अधिक जखमी झाले होता. यात 11 भारतीय तर 5 अमेरिकन नागरिकांचा समावेश होता.