इस्लामाबाद – चीनबाबतच्या धोरणाचा पुनर्विचार करावा, यासाठी पाकिस्तान सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. अन्यथा जगात पाकिस्तानला एकटे पडण्याची भीती आहे. चीन आणि भारतामध्ये तणावाची स्थिती असताना पाकिस्तानवरील दबावात आणखी भर पडली आहे.
सूत्राच्या माहितीनुसार चीनबरोबरील संबंधात त्वरित सुधारणा केली नाही तर जागतिक आर्थिक महासत्तांचा संताप पाकिस्तानला सहन करावा लागणार आहे. याची कल्पना पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने पंतप्रधान इम्रान खान यांना दिली आहे.
पाकिस्तानमध्ये चीनविरोधातही संतापाची भावना आहे. विशेषत: सीपीईच्या प्रकल्पामध्ये बलुचिस्तान आणि गिलगिट बल्टिस्तानमध्ये पाकिस्तानच्या साधनसंपत्तीचा चीन वापर करत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. दुसरीकडे बलुच आणि गिलगिट बल्टिस्तानमध्ये स्थानिकांना डावलून स्वस्तामध्ये काम करणाऱ्या चीनमधील मजुरांना काम दिले जात आहे. बीजिंगच्या कंपन्या स्थानिक परंपरा आणि मालाची काळजी घेत नाहीत. त्यामुळे स्थानिक लोक चिनी कंपन्यांकडे संशयाने पाहतात.
भारताचा भूभाग बळकाविल्याप्रमाणे पाकिस्तानचा भूभागही चीन घेईल, अशी भीती पाकिस्तानी लोकांना वाटत आहे. चीनने मुस्लिमांचा केलेल्या छळाचा विषयही पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सीपीईसी प्रकल्प कोणत्याही किमतीत पूर्ण केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. हा प्रकल्प पाकिस्तान व चीनच्या मैत्रीचे प्रतिक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.