वॉशिंग्टन : अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत करण्यासाठी पाकिस्तान आणि त्यांच्या गुप्तचर संस्थेने तालिबानला मदत केल्याचा आरोप अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या एका खासदाराने केला आहे. अफगाणी नागरिकांवर क्रुरता लादणाऱ्या तालिबानच्या अफगाणिस्तानातील विजयाचा आनंद साजरा करताना पाकिस्तानला बघणे अतिशय घृणास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकन खासदाराचा आरोप
अफगाणिस्तानातील संकटासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच स्पष्टपणे आरोप झाले आहेत. हिंदू राजकीय कृती समितीच्या एका आभासी कार्यक्रमाला संबोधित करताना इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष खासदार स्टीव्ह चॅबोट यांनी रविवारी हे मत व्यक्त केले. अफगाणिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांचे स्वागत केल्याबद्दल भारत सरकारचे अभिनंदनही त्यांनी यावेळी केले.
पाकिस्तानची कृती घृणास्पद
तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता मिळविण्यामध्ये पाकिस्तान आणि त्यांच्या गुप्तचर संस्थेने महत्वाची भूमिका बजावल्याचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तालिबानच्या अफगाणिस्तानातील विजयाचा आनंद साजरा करताना पाकिस्तानी अधिकाऱ्यांना बघणे हे अतिशय घृणास्पद आहे असेही ते यावेळी म्हणाले.
पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार
पाकिस्तानकडून धार्मिक अल्पसंख्याकांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराला अमेरिकेत अपेक्षेपेक्षा कमी महत्व दिले जाते. आपल्या नागरिकांना याविषयी जागृत करण्यासाठी आपण काम करूया. अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे वयस्क मुस्लिम व्यक्तींसोबत लग्न लावून देत जबरदस्तीने धर्मांतर करणे अशा प्रकारचे अत्याचार पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर केले जातात असे ते म्हणाले. अशा प्रकारचे आरोप हे केवळ अफवा नाही असेही त्यांनी अधोरेखित केले. अनेक माध्यम संस्थांनी याचे वार्तांकन केले असून याकडे सहज दूर्लक्ष केले जाते अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.
अमेरिकेत 60 लाख हिंदू
अमेरिकेत 60 लाख हिंदू आहेत. मात्र ते इथल्या समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत. कामाविषयीची अपार निष्ठा आणि उच्च शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे हिंदू अमेरिकेच्या विकासात योगदान देत आहेत. यामुळे अमेरिकेत अनेक महत्वाच्या पदांवर हिंदू व्यक्ती आपल्याला दिसत आहेत असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.
हेही वाचा - अफगाणिस्तान : औषधे व इतर मदतीच्या पुरवठ्यासाठी 'मानवतेचा सेतू' उभारावा; संयुक्त राष्ट्राचे आवाहन