लाहोर - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग(एन) पक्षाचे नेते नवाज शरिफ यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. नवाज शरिफ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराप्रकरणी पाकिस्तानात खटला सुरू आहे. दरम्यान, उपचारासाठी ते इंग्लडला गेले होते. मात्र, तेथून अद्याप माघारी आले नाहीत.
एका ३४ वर्ष जुन्या भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्या विरोधात खटला सुरू आहे. मागील महिन्यात पाकिस्तानातील अकाऊंटीबिलीटी न्यायालयाने शरिफ यांच्या विरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. तसेच त्यांच्या तिन्ही निवासस्थानी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, शरिफ अद्यापही माघारी आले नाहीत. पाकिस्तान सरकार शरिफ यांना परदेशात उपचार करण्यास पाठवत नव्हते. मात्र, शरिफ यांच्या प्रकृतीस काही झाल्यास त्यास सरकार जबाबदार असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांना उपचाराला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता ते माघारी येण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलले जात आहे.
नवाज शरिफ यांनी तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान पद भुषविले आहे. मात्र, इम्रान खान सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी विरोधकांवरील जुन्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास सुरू केला आहे. मागील सहा महिन्यांपासून नवाज शरिफ परदेशात असल्याचे आज पीएमएन पक्षाचे नेते अता तरार यांनी न्यायालयात अधिकृत रित्या सांगितले.