इस्लामाबाद - मृत्यूदंडाची शिक्षा झालेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत असलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या देश पूर्ण करत असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी जाधव यांना पाकिस्तान लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादाबद्दल एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर भारताने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात उपस्थित केला होता.
कुलभूषणवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय लागू केला जात आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयीन निर्णयाशी संबंधित जबाबदाऱ्या आम्ही पाळत आहोत, असे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी सांगितले.
पाकिस्तानचे हे सर्व आरोप फेटाळून लावत कुलभूषण जाधव यांना चाबहारच्या इराणी बंदरातून अपहरण करून आणल्याचे भारताने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तान लष्करी न्यायालयाच्या फाशीच्या निर्णयाला 2019 च्या जुलै महिन्यात स्थगिती दिली. भारत सरकारने या प्रकरणी पाकिस्तान व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे.
कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदतीसाठी वकिलाची सोय भारत सरकारने करावी. यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा दावा इम्रान खान सरकारने केला आहे. तर कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानने प्रभावी उपाययोजना करण्याचे सर्व मार्ग रोखले असल्याचे भारताने गेल्या महिन्यात म्हटले होते. दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणावरील सुनावणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने 3 सप्टेंबर पर्यंत स्थगित केली आहे.