इस्लामाबाद - भारताच्या एका ड्रोनला पाडल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याने केला आहे. हे ड्रोन खंजर क्षेत्रात नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून हेरगिरी करत असल्याचा आरोप पाक सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिकार यांनी केला आहे.
हे ड्रोन नियंत्रण रेषेवरून ५०० मीटर पाकिस्तानच्या बाजूला होते. तसेच ते हेरगिरी करत होते, असेही मेजर जनरल बाबर म्हणाले. तसेच पाक सैन्याने पाडलेले यंदाचे हे आठवे ड्रोन असल्याचा दावा देखील त्यांनी केला. एक २७ मे, तर दुसरे २९ मे रोजी अशा दोन ड्रोनने पाकिस्तानमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. हे दोन्ही पाडण्यात आले, असे ते म्हणाले. मात्र, पाकिस्तानी सैन्याचे हे दावे भारताने फेटाळून लावले आहेत.
गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताच्या ४० जवानांना वीरमरण आले होते. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने बालाकोट येथील जेश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण तळावर हवाई हल्ला केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध जास्तच ताणले गेले. तसेच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम रद्द करून या राज्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध जास्तच दुरावले गेले. पाकिस्तानमधून भारतीय उच्चायुक्तांना देखील देशात परत पाठवण्यात आले होते
.