नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या भीतीमुळे जगभरातील नागरिक आपआपल्या देशांमध्ये परतत आहेत. अनेक देशांनी विमान सेवा बंद केली आहे. अशातच दीड हजार भारतीय विद्यार्थी फिलिपिन्समध्ये अडकून पडले आहेत. तीन दिवसांत देश सोडण्याचे आदेश फिलिपिन्स सरकारने आम्हाला दिले असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
सर्वजण मेडिकल स्टुडंन्ट आहेत. 'तीन दिवसांत आम्हाला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आमच्याकडील सामानही संपत आले आहे. विमान सेवा बंद असल्यामुळे आम्हाला माघारी येता येत नाही. संपूर्ण शहर बंद असल्यामुळे आम्हाला काहीही विकत घेता येत नाही. अशी व्यथा विद्यार्थ्यांनी मांडली आहे.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून भारतातील कुटुंबीयांशी संपर्क केला आहे. तसेच भारत सरकराकडे मदतीची मागणी केली आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी १८ आणि १९ तारखेचे माघारी येण्याचे तिकिटही बुक केले होते. मात्र, १७ तारखेला भारताने फिलिपिन्समधून भारतात येणाऱ्या सर्व उड्डाने रद्द केली आहेत.