इस्लामाबाद - पाकिस्तानच्या न्यायालयात माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी भारतीय वकील देण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे. या पद्धतीने एखाद्या भारतीयास वकील म्हणून नेमणे कायद्याच्या विरुद्ध आहे, असे सांगण्यात आले आहे. जाधव यांच्या बाजूने परीक्षण याचिका (रिव्हिव पीटीशन) दाखल करण्यासाठी भारतीय वकील देण्यात यावा, अशी मागणी भारताकडून करण्यात आली होती.
कुलभूषण जाधव यांचे न्यायालयात प्रतिनिधीत्व करण्यासाठी भारतीय वकील देण्यात यावा, अशी अयोग्य मागणी भारताकडून वारंवार करण्यात येत आहे. आम्ही त्यांना अनेकदा सांगितले आहे की, पाकिस्तानमध्ये वकिली करण्याचा परवाना असलेलाच वकील न्यायालयात जाधव किंवा कुणाचेही प्रतिनिधीत्व करू शकतो. शिवाय भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या एका खटल्यात देशाच्या अंतर्गत न्याय प्रक्रियेत विदेशी वकील वकिली करू शकत नाही, असे सांगितल्याचा दाखला पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहीद हफिज चौधरी यांनी दिला.
हेही वाचा - दक्षिण चिनी समुद्राचं लष्करीकरण; अमेरिकेचा चिनी कंपन्यांना पुन्हा दणका
स्वतंत्र आणि निष्पक्ष निकालाची अपेक्षा असून त्यासाठी जाधव यांची बाजू मांडण्यासाठी भारतीय वकिलाच्या नियुक्तीची मागणी आम्ही केली. पाकिस्तानने मूळ मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणात जाधव यांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे पुरवणे, तसेच जाधव यांना राजनैतिक प्रवेश उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी गेल्या गुरुवारी म्हटले होते. भारताकडून करण्यात आलेल्या मागणीला पाकिस्तानकडून नकार देण्यात आला आहे.