इस्लामाबाद - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. जगभरातून भारताविरोधात पाठिंबा मिळवण्यासाठी पाक जंगजंग पछाडत आहे. मात्र, त्यांना जराही यश मिळालेले नाही. वारंवार पाकची पाठराखण करणाऱ्या चीननेही पाकला या बाबतीत उघडउघड पाठिंबा दिलेला नाही. यानंतर पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री ब्रिगेडियर इजाज अहमद शाह यांनी एका मुलाखतीत 'काश्मीर मुद्द्यावर जगात कोणाचाही आमच्यावर विश्वास नाही,' अशी कबुली दिली आहे.
'आंतरराष्ट्रीय समुदायातील लोकांचा आमच्यावर विश्वास नाही. आम्ही त्यांना भारताने काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केल्याचे आणि तेथे औषधांचाही पुरवठा होत नसल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही. उलट, भारतावरच विश्वास ठेवला. सत्तेत आलेल्या सर्वांनी देशाचे नाव धुळीस मिळवले. लोकांना आमच्या देशाला गांभीर्याने घ्यावेसे वाटत नाही,' असे इजाज यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - काश्मीरमध्ये शस्त्रसाठा घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला
नुकतीच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाकडे पाकिस्तानने भारत काश्मीरमध्ये मानवाधिकारांचा चुराडा करत असल्याची तक्रार केली होती. तेथे पाक परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी 'भारताने जम्मू-काश्मीरचे या ग्रहावरच्या सर्वांत मोठ्या तुरुंगात रूपांतर केले आहे. तेथे मानवाधिकार पायदळी तुडवले जात आहेत,' असे म्हटले होते. मात्र, काश्मीर मुद्दा ही आपली अंतर्गत बाब असल्याचे सांगत भारताकडून स्वतःची बाजू ठामपणे मांडण्यात आली. तसेच, पाकिस्तान जगभरातील दहशतवादाचे केंद्रस्थान असल्याची टीका भारताकडून करण्यात आली. शिवाय, पाकिस्तानविरोधात बलुची कार्यकर्त्यांनी लोकांच्या व्यथा मांडल्या. पाकिस्तान त्यांच्याच नागरिकांवर अत्याचार करत असल्याचे वारंवार पुढे येत आहे. शेवटी जम्मू-काश्मीर भारताचे राज्य असल्याचे कुरेशी यांनी म्हटले होते.
हेही वाचा - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रात भारत स्वयंपूर्ण, DRDO ने घेतली यशस्वी चाचणी
पाकिस्तानने आतापर्यंत जगभरातील नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यात अबु धाबीचे राजे मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान, फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्युअल मॅक्रॉन, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (II) यांचा समावेश होता. मात्र, पाकच्या पदरी निराशाच पडली. शिवाय, पाकिस्तानलाच भारताशी चर्चा करून तणाव कमी करण्यास सांगण्यात आले. भारताने पाक दहशतवादाचा प्रसार करणे पूर्णपणे थांबवत नाही, तोवर कसलीही चर्चा होणे शक्य नाही, अशी करारी भूमिका घेतली आहे.