कराची - दोन दिवसांपूर्वी कराची स्टॉक एक्सजेंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली होती. मात्र, आज पुन्हा एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे प्रवक्ता आझाद बलूच यांनी संबधित हल्ल्याशी संघटनेचा संबध नसल्याचे म्हटलं. ज्यांनी संघटनेचे नाव वापरून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांना संघटनेतून हद्दपार केले गेले आहे. या हल्ल्याशी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा संबध नाही, असे त्यांनी म्हटलं आहे.
कराचीतील पाकिस्तान शेअर बाजार इमारतीवर सोमवारी सकाळी दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवादी इमारतीबाहेर गाडीतून उतरले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य प्रवेशद्वारावर ग्रेनेड फेकून इमारतीत घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात होते, त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवताच त्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. या वेळी दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरील चकमकीत मारले गेले, तर इमारतीत घुसलेल्या अन्य दोन दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केले.
मोटारीतून आलेल्या चार सशस्त्र दहशतवाद्यांनी अतिसुरक्षित अशा पाकिस्तान शेअर बाजार इमारतीच्या प्रवेशद्वारावर स्वयंचलित बंदुकांमधून बेछूट गोळीबार केला आणि हातबॉम्बही फेकले. यावेळी सुरक्षारक्षकांशी झालेल्या चकमकीत दोन नागरिक, एक पोलीस निरीक्षक आणि चार सुरक्षा रक्षक ठार झाले. कराचीतील चुंद्रीनगर रस्त्यावर हा शेअर बाजार आहे. हा भाग ‘पाकिस्तान वॉल स्ट्रीट’ म्हणून ओळखला जातो. तेथे मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते.