काठमांडू - देशात मागील ४ दिवसांपासून फनी चक्रीवादळाने ठाण मांडले आहे. शंभर मैलांहून अधिक वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी भारताच्या पूर्व किनारपट्टीला जेरीस आणले आहे. त्याची झळ मात्र हिमालय पर्वतापर्यंत बसत आहे. चक्रीवादळातील वाऱ्याच्या झोताने हिमालयातील एव्हरेस्ट बेस कॅम्पमधील २० टेण्ट गेले उडून गेले. नेपाळी सरकारने या संकटाची सूचना पूर्वीच जारी केली होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वेगवान वाऱ्यांमुळे अनेक टेण्टचे मोठे नुकसान झाले. पर्यटन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या हॉटेल आणि गिर्यारोहण विभागाच्या संचालक मीरा आचार्य यांनी याविषयी माहिती दिली. 'आम्हाला काही टेण्टेचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, सर्व गिर्यारोहक, पर्यटक आणि त्यांना सहकार्य करणारे कर्मचारी सुरक्षित आहेत,' असे त्या म्हणाल्या.
वेगवान वाऱ्यांमुळे पूर्व नेपाळच्या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, असे वृत्त स्थानिक वृत्तसंस्थांनी दिले आहे. नेपाळवर फनीचा थेट परिणाम होणार नाही, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. मात्र, येथील हेलिकॉप्टर्सना खबरदारी म्हणून उड्डाण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.