मेलाका - मलेशियन पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी वादग्रस्त इस्लामी उपदेशक झाकीर नाईक याचे भारताला प्रत्यर्पण न करण्याचा अधिकार मलेशियाला असल्याचे म्हटले आहे. नाईक याला भारतात योग्य प्रकारे न्याय मिळणार नाही, असे मोहम्मद यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियानेही अशाच प्रकारे कारण देऊन सिरुल अझहर उमर याचे २०१५ मध्ये मलेशियाला प्रत्यर्पण करण्यास नकार दिला होता.
'आम्ही ऑस्ट्रेलियाला सिरुल याचे मलेशियाला प्रत्यर्पण करावे, अशी विनंती केली होती. मात्र, आमच्या देशात त्याला थेट फाशी देण्यात येईल, अशा शंकेने त्यांनी हे प्रत्यर्पण करण्याचे नाकारले होते. अशाच प्रकारे झाकीर याला भारतात योग्य वागणूक दिली जाणार नाही, असे आम्हाला वाटते,' असे मोहम्मद यांनी म्हटले आहे.
झाकीर याच्यावर भारतात सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचे आणि सामाजिक सलोखा नष्ट करण्याचे आरोप आहेत. याशिवाय भारत आणि बांगलादेशात घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणात त्याची संशयित म्हणून चौकशी सुरू आहे. ढाका येथील हॉली आर्टिसन बेकरी येथे जुलै २०१६ मध्ये झालेल्या स्फोटातील २ आरोपींनी नाईक याच्या उपदेशाने प्रभावित होऊन या कृत्यांमध्ये सहभाग घेतल्याचे कबूल केले आहे. या दोघांनी नाईक याचे फेसबुक आणि पीस टेलिव्हिजन चॅनलवर अनुसरण करत असल्याचे सांगितले आहे. या दहशतवादी हल्ल्यात २२ जण ठार झाले होते.
याशिवाय, ईडीकडून नाईक याची अवैध संपत्ती प्रकरणी चौकशी सुरू आहे. २२ डिसेंबर २०१६ मध्ये त्याच्यावर हे आरोप ठेवण्यात आले होते. झाकीर याची गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी १९३.०६ कोटींची रक्कम आणि ५०.४६ कोटींची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. या अवैध संपत्तीचे धागेदोरे यूएईमध्ये असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे.