नवी दिल्ली - भारत बांगलादेशात मंगळवारी रोहिंग्या प्रश्न, तिस्ता नदी आणि सीमा विषयावर परराष्ट्र मंत्री स्तरावर चर्चा झाली. भारत बांगलादेश जॉईन्ट कन्सल्टेटिव्ह कमिशनच्या(जेसीसी) बैठकीत द्विपक्षीय महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि बांगलादेशचे समकक्ष डॉ. ऐ. के. अब्दुल मोमिन यांनी बैठकीत सहभाग घेतला होता.
हेही वाचा - चाकू हल्ल्यानंतर आज स्फोटाच्या आवाजाने फ्रान्स पुन्हा हादरले
बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रक जारी केले. दोन्ही देशांतील सध्याच्या द्विपक्षीय संबंधांवर बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले. जेसीसीची ही सहावी बैठक होती. आधीच्या बैठकांतून अनेक प्रश्नांवर चर्चेतून तोडगा काढण्यात आला आहे. डिसेंबर २०२० मध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधान स्तरावर व्हर्च्युअल स्तरावर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यासही दोन्ही देशांनी दुजोरा दिला.
बांगलादेशचे माजी पंतप्रधान शेख मुजिबुर रेहमान यांच्या जन्मशताब्दीला भारत पोस्टल स्टँप प्रकाशित करणार असल्याचे एस. जयशंकर यांनी जाहीर केले. बांगलादेश मुक्ती संग्रामाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष दोन्ही देशांनी मिळून साजरे करण्याचे एकमत बैठकीत झाले आहे. तसेच १९७० साली बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर राजकीय संबंधांनाही ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे आहे.