ट्रॉन्डहाइम (नॉर्वे) - भारतात अनेक वारसा स्थळे आहेत. यापैकीच एक असलेले अत्यंत महत्त्वाचे वारसास्थळ म्हणजे अजिंठा लेणी, या अजिंठा लेणीच्या इतिहासाचे आणि त्याच्या संदर्भातल्या माहितीचे आता डिजिटलायझेशन होणार आहे. त्यामुळे अजिंठा लेणीचा इतिहास आता जगासमोर येण्यासाठी मदत होणार आहे. आर्टिक वर्ल्ड अर्काइव्ह या ऐतिहासिक माहितीचे संवर्धन करणाऱ्या जागतिक दर्जाच्या संस्थेने लेणीच्या डिजिटलायझेशनचा निर्णय घेतला आहे.
आर्टिक वर्ल्ड अर्काइव्ह ही नॉर्वेमधील एक प्रमुख संस्था आहे. जी जगभरातील ऐतिहासिक वास्तूंच्या माहितीचे संवर्धन डिजिटल स्वरुपात करते. या संस्थेकडून आता अजिंठा लेणीच्या इतिहासाचे देखील डिजिटलायझेशन होणार असल्याची माहिती या संस्थेच्या सदस्यांनी दिली. आर्टिक वर्ल्ड अर्काइव्हचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक रुण बेरकॅस्ट्रेंड यांनी याबाबत माहिती देतांना म्हटले आहे की, अंजिंठा लेणीला एक वेगळा इतिहास आहे. या लेणीच्या माध्यमातून भारताच्या प्राचीन आणि महान अशा संस्कृतीचा उलगडा होतो. अंजिंठा लेणीमधील शिल्प हे आशिया खंडातील सर्वेत्तम वास्तूकलेचा नमुना आहे. त्यामुळे या माहितीचे जतन करण्याचा निर्णय आमच्या संस्थेने घेतला आहे.