काबूल/नवी दिल्ली - अफगाणिस्तानवर तालिबान या दहशतवादी संघटनेने पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. अफगाणिस्तानच्या काबूलमधील बिघडलेली परिस्थिती पाहता भारतीय दुतावासातील 120 कर्मचाऱ्यांना घेऊन भारतीय वायुसेनेचे विमान तिथून निघाले. भारतीय वायुसेनेचे C-17 विमान आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास काबूलहुन उड्डाण केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये फसलेल्या बाकीच्या नागरिकांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमेरिकन एजन्सीजने काबूल विमानतळाला सकाळी पुन्हा सुरू केले होते. अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. सोमवारी सकाळी काबूल विमानतळावरील परिस्थिती फार भीषण झाल्यामुळे विमानतळावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
दोन दशकांपर्यंत चाललेल्या युद्धानंतर अमेरिकेने आपले पूर्ण सैन्य अफगाणिस्तानातून माघारी बोलावले. यानंतर दोन आठवड्याआधी तालिबानने या देशावर आपला ताबा मिळवला. बंडखोरांनी पूर्ण देशात परिस्थिती बिघडवून टाकली. येथील स्थानिक सुरक्षादलांनी शरणागती पत्करली. यामुळे काही दिवसांतच देशातील सर्व प्रमुख शहरांवर आपले नियंत्रण मिळवले.
अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वाशिंग्टनने ओसामा बिन लादेन आणि त्याला शरण देणाऱ्या तालिबानला धडा शिकवण्यासाठी बंडखोरांना सत्तेतून बाहेर ढकलले. यानंतर, अमेरिकेने ऐबटाबाद मध्ये ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता.
1990च्या दशकाच्या शेवटांपर्यंत तालिबानचे अफगाणिस्तानवर नियंत्रण होते. यानंतर पुन्हा एकदा त्यांनी या देशावर नियंत्रण मिळवले होते. तालिबानने अफगाणिस्तानात नियंत्रण मिळवल्याने येथील नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. काबूल विमानतळावर देश सोडण्यासाठी नागरिकांची जमलेली गर्दी पाहून हे स्पष्ट होते की, नागरिकांमध्ये किती भीती निर्माण झाली आहे.