इस्लामाबाद - माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाचे नेते नवाझ शरीफ यांना पाकिस्तानातील न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. मात्र, तुरुंगात असताना प्रकृती ढासळल्याने ते इंग्लंडला गेले होते. मात्र, अद्याप शरीफ पाकिस्तानात माघारी आले नाहीत. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान शरीफ यांना पाकिस्तानात माघारी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शरीफ यांच्या विरोधात पाकिस्तानातील अनेक न्यायालयात इतरही खटले सुरू आहेत.
नोव्हेंबर २०१९ ला नवाझ शरीफ पाकिस्तानात गेले आहेत. प्रकृती ढासळल्याने पुढील उपचारासाठी इंग्लंडला जाण्यासाठी त्यांनी न्यायालयात परवानगी मागितली होती. इम्रान खान सरकार त्यांना परवानगी देत नव्हते. मात्र, जर शरीफ यांना काही झाले तर त्यास पाकिस्तान सरकार जबाबदार असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर त्यांना इंग्लंडला जाण्यास परवानगी देण्यात आली. परंतु, उपचारास गेल्यानंतर त्यांनी माघारी येण्यास नकार दिला. त्यामुळे इम्रान खान यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली.
हेही वाचा - नवाज शरीफ यांच्या प्रत्यार्पणासाठी पाकिस्तानचे प्रयत्न
लाहोर उच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना 29 ऑक्टोबर 2019 ला उपचारासाठी 8 आठवड्यांचा जामीन दिला होता. 19 नोव्हेंबरला नवाज शरीफ उपचारासाठी लंडनला गेले होते. त्यानंतर जामिनाची मुदत संपल्यानंतरही ते पाकिस्तानला परतले नाहीत. त्यावर इम्रान खान यांनी कॅबिनेट बैठकीत शरीफ यांना फरार घोषित केले. शरीफ यांनी जामिनासाठी असलेल्या अटी व शर्थींचे उल्लंघन केल्याचेदेखील पाकिस्तान सरकारने म्हटले आहे. पाकिस्तानचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे. शरीफ यांच्या प्रत्यार्पण प्रक्रियेस वेग देण्याचा निर्णय आज पाकिस्तानच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे.