हैदराबाद- कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जगभरामध्ये आतापर्यंत 70 लाख 80 हजार 811 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 4 लाख 5 हजार 74 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 34 लाख 55 हजार 104 जण कोरोनामुक्त झाले आहेत. न्यूझीलंड हा देश कोरोनामुक्त झाल्याची माहिती तेथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.
न्यूझीलंडमधील शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. मागील 17 दिवसांपासून एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. फेब्रुवारी महिन्यापासून न्यूझीलंडमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. देशात सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण नाही, असा आजचा पहिला दिवस असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
परदेशातून एकही कोरोनाबाधित व्यक्ती देशात येणार नाही, याची काळजी न्यूझीलंड मध्ये घेतली जात आहे. त्यासाठी देशाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. मात्र, न्यूझीलंडच्या नागरिकांसाठी नियमांमध्ये सूट देण्यात आलीय.
देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टींचा फायदा झाला. आमचा देश दक्षिणेकडे असल्याने आम्हाला इतर देशात होणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रसाराचा अभ्यास करता आला. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न यांनी वेळीच योग्य पावले उचलत कोरोनाचा प्रसार सुरुवातीच्या टप्प्यात लॉकडाऊनचे कडक पालन करण्याचे आदेश दिले, याचाही परिणाम झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जगभरामध्ये तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.