इस्लामाबाद - मृत्यूदंडाची शिक्षा झालेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदतीसाठी वकील उपल्बध करून देण्यासंदर्भात आज इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान, उच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय दिला नसून येत्या 6 ऑक्टोंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. तसेच न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकिल नेमण्याची आणखी एक संधी भारताला दिली आहे.
कलम 1961 अतंर्गत भारतीय वकिल पाकिस्तानमध्ये वकिली करू शकत नाही. पाकिस्तानमध्ये वकिली करण्याचा परवाना असलेलाच वकील न्यायालयात जाधव किंवा कुणाचेही प्रतिनिधीत्व करू शकतो, असे पाकिस्तानने म्हटलं आहे. स्वतंत्र आणि निष्पक्ष निकालाची अपेक्षा असून त्यासाठी जाधव यांची बाजू मांडण्यासाठी भारतीय वकिलाच्या नियुक्तीची मागणी भारताने केली आहे. भारताकडून करण्यात आलेल्या मागणीला पाकिस्तानकडून नकार देण्यात आला आहे.
दरम्यान, कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान मधून 2016 मध्ये हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन अटक केली, असा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. इरानियन पोर्ट चबहार येथून पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचे अपहरण केले, असा भारताचा दावा आहे. 2017 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तान लष्करी न्यायालयाच्या या निर्णयाला 2019 च्या जुलै महिन्यात स्थगिती दिली. भारत सरकारने या प्रकरणी पाकिस्तान व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे.