इस्लामाबाद - पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात भूसुरुंग स्फोटात पाच लोक ठार आणि पाच जण जखमी झाले. वृत्तसंस्था सिन्हुआने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. शुक्रवारी रात्री सिबी जिल्ह्यात हा स्फोट झाला.
जिल्हा पोलीस उपायुक्त यासिर खान बाजाई यांनी सांगितले की, मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहन या भूसुरंग स्फोटाच्या तडाख्यात सापडले. या स्फोटामुळे वाहनाला अपघात झाला. या घटनेत चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर, आणखी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.
वृत्तानुसार, सुरक्षा दलांनी आजूबाजूच्या भागात कारवाई सुरू केली आहे. हे भूसुरुंग कोणी लावले, याबाबत आतापर्यंत माहिती मिळालेली नाही. तसेच, अद्याप कोणत्याही गटाने किंवा व्यक्तीने स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.