काठमांडू (नेपाळ) - नेपाळचे माजी राजे ग्यानेंद्र शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते नुकतेच भारतातील हरिद्वार येथे आयोजित कुंभमेळा येथून परतले. यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
ग्यानेंद्र शाह आणि त्यांच्या पत्नी कोमल शाह या रविवारी नेपाळला परतल्या. यानंतर त्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक होते. यांत या दाम्पत्याचा कोरोना अहवाल हा आज (मंगळवारी) पॉझिटिव्ह आला. यानंतर ते आता गृह विलगीकरणात आहे. सूत्रांनुसार, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
दरम्यान, भारतात येण्यापूर्वीही 8 एप्रिलला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. महाकुंभ मेळा विशेष समिती 2021 यांच्यावतीने त्यांना निमंत्रण देण्यात आले होते.
ग्यानेंद्र शाह यांनी 12 एप्रिलला मुख्य अतिथी म्हणून शाही स्नानाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यानंतर त्यांनी पतंजली योगपीठ येथेही भेट दिली. तसेच ग्यानेंद्र शाह यांनी निरांजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज यांची दक्षिण काली मंदिरात भेट घेतली होती.
तसेच ग्यानेंद्र यांनी आपल्या भेटीदरम्यान, साधू संतांना संबोधित करत हिंदू धर्माचे महत्त्व अधोरेखित केले. दरम्यान, ग्यानेंद्र शाह हे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात सहभाग घेणारे पहिले माजी राजे आहेत.