कैरो- टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत राहतात. त्यांनी पिरॅमिड हे परग्रहवासियांनी बांधल्याचे ट्विट केले. या ट्विटची इजिप्त सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. पिरॅमिड हे परग्रहवासियांनी बांधले की नाही, हे तपासण्यासाठी इजिप्तला येण्याचे सरकारने मस्कला निमंत्रण दिले आहे.
टेस्लाच्या सीईओने ट्विटमध्ये म्हटले होते, पिरॅमिड हे नक्कीच परग्रहवासियांनी बांधलेले आहेत. हे ट्विट 88 हजारांहून अधिकवेळ रिट्विट करण्यात आले आहे. ग्रेट पिरॅमिड हे मानवाने 3 हजार 800 वर्षांपूर्वी बांधलेली सर्वात उंच रचना आहे. त्यासोबत विकीपिडियाची गिझामधील ग्रेट पिरॅमिडची माहिती देणारी लिंकही मस्कने ट्विटमध्ये दिली.
इजिप्तचे आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री रनिया-अल-मश्कत यांनी मस्कच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की तुमच्या कामाचे मला खूप कौतुक वाटते. मी तुम्हाला आणि स्पेसएक्सला इजिप्तमध्ये आमंत्रित करत आहे. तुम्ही पिरॅमिड कसे बांधले अथवा त्याचे घुमट कोणी बांधले हे तपासा. आम्ही तुमची वाट पाहत आहोत. इजिप्तचे पुरातत्वशास्त्रज्ञ झही हवास यांनी अरबीमध्ये समाज माध्यमात व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये मस्कचे मत हे पूर्णपणे भ्रामक असल्याचे म्हटले आहे.