बीजींग - चीनमध्ये हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत तब्बल १३२ लोकांचा बळी घेतला आहे. वेगाने पसरत असलेल्या या विषाणूचा संसर्ग आतापर्यंत देशातील सहा हजार नागरिकांना झाल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच आणखी नऊ हजार लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेला हा विषाणू आतापर्यंत देशातील ३१ प्रांतांमध्ये पसरला आहे.
चीनमधून सुरू झालेला हा विषाणू आता जगभरात पसरला आहे. थायलंड (१४), हाँग-काँग (८), अमेरिका, तैवान, ऑस्ट्रेलिया, मकाऊ (प्रत्येकी ५), सिंगापूर, दक्षिण कोरिया, मलेशिया, फ्रान्स (प्रत्येकी ४), जपान (७), कॅनडा (३), व्हिएतनाम (२), नेपाळ, श्रीलंका, कंबोडिया, जर्मनी (प्रत्येकी १) या देशांमध्ये या विषाणूचे रूग्ण आढळून आले आहेत.
भारतातील अनेक शहरांमध्ये या विषाणूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले नाही. दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालय चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी पुढे सरसावले आहे. चीनमधील भारतीयांनी आपल्या पासपोर्टची माहिती लवकरात लवकर भारतीय दूतावासामध्ये देण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
हेही वाचा : थायलंडच्या महिलेचा कोलकाताच्या रुग्णालयात मृत्यू; कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय..