इस्लामाबाद - सत्ताधारी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढील अडणीत वाढ झाली आहे. पीटीआय पक्ष सत्तेत येण्यासाठी लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा जबाबदार असून इम्रान खान हे 'सिलेक्टेड पंतप्रधान' आहेत, असा आरोप विरोधी पक्षांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
विरोधी पक्षांनी 'पाकिस्तान डेमॉक्रॅटिक अलायन्स'(पीडीएम) स्थापन केली असून यात ११ पक्षांचा समावेश आहे. पंजाब प्रांतातील गुजरवाला शहरात सर्व विरोधी पक्षांकडून इम्रान खान सरकार विरोधात काल(शुक्रवार) जोरदार निदर्शने करण्यात आली. पाकिस्तान मुस्लिम लीग(नवाज) पक्षाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही मागील काही दिवसांत इम्रान खान सरकारवर हल्लाबोल केला आहे. पाकिस्तान लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या पाठिंब्याने पीटीआय पक्ष सत्तेत आल्याचा आरोप त्यांनी इंग्लडमधून केला आहे.
'इम्रान खान सरकारने माध्यमांची गळचेपी केली आहे. भ्रष्टाचाराबाबत कोणीही बोलत नाही. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आली असून पत्रकारांचे अपहरण होत आहे', असे विरोधी पक्षनेत्या मरयम शरिफ म्हणाल्या. यावर्षाच्या सुरुवातीलाही विरोधी पक्षांनी आजादी मार्च काढून इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.