बीजिंग - चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा १ हजार ३८० वर पोहोचला आहे. तर, संसर्ग झालेल्या नागरिकांचा संख्या ६३ हजार झाली आहे. गुरुवारी एकाच दिवसांत दोनशेपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
फिलिपाईन्स, हाँगकाँग आणि आता जपानमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. डिसेंबरमध्ये चीनमधील हुबेई प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. तसेच २६ देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. चीनमध्ये हजारो नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे अनेक देशांनी चीनमधील आपल्या नागरिकांना बाहेर काढले आहे. तसेच चीनमधून येण्यास आणि जाण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. भारतानेही हुबेई प्रांतात अडकलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढले आहे. मात्र, अजूनही बरेचजण तेथे अडकून पडले आहे. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.
हुबेई प्रांताबाहेर विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून इतर चीनशी या भागाचा संपर्क तोडण्यात आला आहे. त्यामुळे लाखो लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. बस, ट्रेन, विमान सेवा पुर्णतहा: ठप्प झाली आहे. नागरिकांना जीवनोपयोगी वस्तू घेणेही मुश्किल झाले आहे. सर्व शहरे सुमसाम झाली आहे. आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत असून काही प्रमाणात यश येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाला आरोग्य आणीबाणी हाताळताना अडचणी येत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचेही प्रशासनाने मान्य केले आहे.