'या महान देशाचा पाया कोणीही हलवू शकत नाही. आज जगासमोर समाजवादी चीन उभा आहे. चीनचे सैन्य हे नक्कीच देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाच्या हितसंबंधांचे पूर्ण रक्षण करेल, आणि जागतिक शांततेचे समर्थन करेल.' असे मत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केले. चीनच्या ७०व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
वरवर जरी हा शांतीचा संदेश वाटत असला, तरी दुसऱ्या शब्दांमध्ये या संदेशाचा अर्थ असा होता, की चीन आज अमेरिकेच्या पराक्रमी व सामरिक वर्चस्वाला आव्हान देण्याच्या स्थितीत आहे. तसेच, चीनला जगातील कोणत्याही देशाशी असलेल्या आपल्या भौगोलिक-आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्यात अडचण येणार नाही. खरे तर हा; तैवानपासून ते दक्षिण चीन समुद्रापर्यंतचा भाग ते भारताच्या ईशान्येकडील मॅक मोहन लाईन या पाणलोट क्षेत्रापर्यंत असलेल्या चीनच्या सर्व विरोधकांसाठी एक इशाराच होता.
साम्यवादी चीनच्या ७०व्या वर्धापनदिनानिमित्त, बीजींगमधील टियानॅनमेन स्क्वेअरवर झालेल्या संचलनात जवळपास १५,००० जवान, १६०हून अधिक विमाने आणि ५८० लष्करी शस्त्रे आणि उपकरणे यांचा समावेश होता. यामधून चीनने हे दाखवून दिले, की चीन हे पूर्णपणे प्रगत राष्ट्र आहे, आणि चीनकडे अमेरिकेच्या सामरिक महत्त्वापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी पुरेशी प्रगत सैन्य क्षमता आहे.
हेही वाचा : गांधी @१५० : फ्रान्स, उझबेकिस्तानसह टर्की, पॅलेस्टाईन देशांनी छापले गांधीजींचे पोस्टाचे तिकीट
१९९०च्या सुरुवातीलाच पी.एल.ए आधुनिकीकरण प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्यामधूनच चीन हळूहळू मात्र निश्चयीपणे २०३५ पर्यंत जागतिक दर्जाचे लष्कर उभारण्याकडे वाटचाल करत आहे. भारतासारख्या देशांसाठी चीनमध्ये झालेली ही परेड, एक 'वेक अप कॉल' असावा. भारताने या सर्वाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, कारण या संचलनादरम्यान दाखवलेल्या काही यंत्रणा या खूपच अत्याधुनिक आहेत. भविष्यात होणाऱ्या युद्धांचा चेहरामोहरा पालटण्याची क्षमता या यंत्रणांमध्ये आहे.
नव्वदच्या दशकापासूनच चीन युद्ध-तंत्रज्ञान अद्ययावत करण्याच्या दृष्टीने काम करत आहे. २०१९ पर्यंत त्यांनी या तंत्रज्ञानाच्या, प्रणालींच्या संकल्पनांना फक्त कागदावर न ठेवता, सत्यात उतरवले आहे. हीच गोष्ट त्यांनी टियानॅनमेन स्क्वेअरवरून जगाला दाखवून दिली. या प्रदर्शानत असलेल्या उपकरणांमधून 'सिस्टम विरूद्ध सिस्टम' ऑपरेशन्स करु शकणारी यंत्रे विशेष आकर्षणाचा भाग ठरली. या अद्ययावत यंत्रांमध्ये जास्त वेगवान उपकरणे, अधिक सक्षमपणे लपू शकणारी यंत्रे, लांब पल्ल्याचा आणि अचूक हल्ला करू शकणारी यंत्रे तसेच माहिती वर्चस्व निर्माण करु शकणाऱ्या यंत्रांचा समावेश होता. 'सक्रिय बचावासाठी लष्करी मार्गदर्शक सूचना' हे आधुनिक माओवाद्यांचे विधान आहे.
हायपरसॉनिक शस्त्रांमध्ये चीन अमेरिकेच्या पुढेच असल्याचे या संचलनानंतर पुन्हा सिद्ध झाले. डीएफ-१७ हे आवाजाच्या वेगाच्या पाच पट अधिक वेगाने जाण्याची क्षमता असलेले हायपरसॉनिक विमान चीनच्या ताफ्यामध्ये आहे. या विमानाच्या प्रचंड वेगामुळे त्याला निकामी करणे किंवा त्याचा प्रतिरोध करणे जवळपास अशक्य आहे. याविमानासोबत अण्विक शक्तीचा वापर केला गेल्यास अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना गंभीर धोका उपलब्ध होऊ शकतो. चीनने डीएफ-४१ इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) देखील प्रदर्शित केले. हे जगातील सर्वात शक्तिशाली आयसीबीएम आहे. हे जमीनीवरून कोठेही नेता येते, तसेच एकावेळी दहा अण्विक वॉरहेड्स नेण्यास सक्षम आहे. अण्विक वॉरहेड्स ठेवण्याच्या क्षमतेमध्ये याने रशियाच्या एसएस-१८ सॅटन आयबीसीएमला देखील मागे टाकते. शिवाय, या तुलनेचे कोणतेही आयसीबीएम अमेरिकेकडे उपलब्ध नाही. या प्रदर्शनातील आणखी एक आकर्षक, मात्र भारतासाठी अत्यंत धोकादायक शस्त्र म्हणजे, गोंगजी-११ स्टील्थ अटॅक ड्रोन. छुप्या पद्धतीने हल्ला करण्यास सक्षम असलेले हे ड्रोन भारताच्या ईशान्य भागात बराच धोका निर्माण करू शकते. यासोबतच डीआर -8 नावाच्या सुपरसोनिक रेकॅनिसन्स ड्रोनचेही प्रदर्शन करण्यात आले. हे ड्रोन पीआरए रॉकेट फोर्स, नेव्ही आणि एअर फोर्सबरोबर काम करण्यासाठी डिझाइन केले आहे. अमेरिकन कॅरियरचा लढाऊ गट शोधण्यासाठी आणि डीएफ-17 सारख्या स्ट्राइक फोर्स प्रणालींवर माहिती पाठविण्यासारख्या कामांसाठी याचा प्रमुख वापर केला जाऊ शकतो.
या अत्याधुनिक शस्त्रांसह मोठ्या प्रमाणात रणगाडे, सशस्त्र लढाऊ वाहने, जे-२० स्टील्थ फायटर आणि नवीन एच-६एन बॉम्बर, वायजे-१८ सुपरसॉनिक जहाज-विरोधी समुद्री मिसाईल्स आणि डी-एफ-२६ जहाज विरोधी बॅलिस्टिक मिसाईल प्रणाली या उपकरणांचेदेखील प्रदर्शन टियानॅनमेन स्क्वेअरवर करण्यात आले.
हेही वाचा : अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धच्या काळातलं जुनाट बॉम्बर विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू
ही अत्याधुनिक युद्धसामग्री पाहता एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते, की इंडो-पॅसिफिक प्रांतामध्ये अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांना सामोरे जाण्यासाठी चीन सुसज्ज आहे. प्रवेश-विरोधी आणि क्षेत्र-प्रतिबंधक (ए२एडी) अशा क्षमता चीन आत्मसात करत आहे. या 'ए२एडी' प्रक्रियेसाठीच चीन प्रगत सुपरसोनिक ड्रोन, हायपरसोनिक ग्लाइड वाहने, अत्याधुनिक हवाई लढाऊ क्षमता आणि क्षेपणास्त्र प्रणाली तयार करत आहे.
मात्र, अमेरिकेसह भारतासमोरदेखील चीनने आव्हान उभे केले आहे. अमेरिकेला चीनच्या ए२एडी क्षमतेला सामोरे जावे लागणार आहे. तर भारताला चीनच्या समोर उभी ठाकू शकेल अशा क्षमतेची आधुनिक युद्धसामग्री तयार करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावे लागणार आहे. चीनच्या ७०व्या वर्धापनदिनाची परेड हा केवळ अमेरिकेसाठीच नव्हे, तर जपान, तैवान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि भारत अशा चीनच्या शेजारील विरोधी राष्ट्रांसाठीदेखील एक धोक्याचा इशारा होता. चीनने युद्ध-तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीकडे दुर्लक्ष करणे या देशांसाठी नक्कीच धोकादायक ठरणार आहे.
(हा लेख संरक्षण आणि सामरिक कार्य क्षेत्रातील तज्ज्ञ कर्नल दानवीर सिंग यांनी लिहिला आहे.)
हेही वाचा : निजामाच्या बँकेतील पैशांवर भारताचा हक्क; ७० वर्षांनी लागला निकाल