बीजिंग - चीनने डीएफ-४१ या अत्याधुनिक आंतरखंडीय (जगातील सर्व खंडांदरम्यान) पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे अनावरण केले. हे क्षेपणास्त्र चीनमधून डागले असता, अमेरिकेवर केवळ ३० मिनिटांत हल्ला करू शकतील, एवढी याची प्रचंड क्षमता आहे. संपूर्ण जगातील हे सर्वांत शक्तिशाली क्षेपणास्त्र असून बीजिंग येथे राष्ट्रीय दिनाच्या परेडदरम्यान याचे अनावरण करण्यात आले.
हेही वाचा - टेक्सासमध्ये शीख पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
डीएफ-४१ या क्षेपणास्त्राचा पल्ला तब्बल ९ हजार ३२० मैलांचा (१५ हजार किलोमीटर) आहे. अशा प्रकारचे दुसरे क्षेपणास्त्र जगात नसल्याचे चीनमधील स्थानिक वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
या क्षेपणास्त्राद्वारे वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करणारी १० आण्विक स्फोटके वाहून नेणे शक्य आहे. अशा आण्विक स्फोटकांसह चीनपासून अमेरिकेपर्यंत हे क्षेपणास्त्र केवळ ३० मिनिटांत पोहोचू शकते, असे सामरिक आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्रीतील क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्पाने म्हटले आहे.
चीनमधील कम्युनिस्ट राजवटीच्या स्थापनेनिमित्त राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. या राजवटीच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित परेडवेळी डीएफ-४१ सह इतर नव्या लष्करी सामुग्रीचेही प्रदर्शन मांडण्यात आले होते. सध्या चीनकडे जगातील सर्वांत मोठे लष्करी सामर्थ्य तर, जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हवाई सामर्थ्य आहे.
हेही वाचा - पाकिस्तान आणि 'अल कायदा'ला मोदी सांभाळून घेतील : डोनाल्ड ट्रम्प
या परेडदरम्यान, १ लाख सैनिकांनी संचलन केले. तसेच, विविध लष्करी वाहने, पाण्याखाली उपयुक्त ठरणारी लष्करी वाहने, हेलिकॉप्टर्स, पारंपरिक ड्रोन्स, नवी स्टेल्थ प्रणाली असलेली आणि ध्वनीच्या पाचपट वेगाने प्रवास करू शकणारी डीआर-८ ड्रोन्स यांनीही सलामी दिली. अत्याधुनिक रणगाडेही मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. तसेच, अत्यंत महत्त्वाची शस्त्रास्त्रे आणि यापूर्वी कधीही जगासमोर न आणलेली युद्धसामुग्रीचे यावेळी प्रदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय दिनाच्या सुरुवातीला चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी टियानान्मेन स्क्वेअर येथून देशाला संबोधित केले. या वेळी बोलताना 'चीनी राष्ट्र आणि चीनी लोकांना पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही,' असे ते म्हणाले. चीनचे अध्यक्ष झाल्यापासून जिनपिंग यांनी चौथ्यांदा मोठ्या लष्करी परेडला संबोधित केले.