बीजिंग : चीनचे पहिलेच मार्स रोव्हर हे आपल्या लँडिंग प्लॅटफॉर्मवरुन मंगळाच्या जमीनीवर उतरले. हे रोव्हर सुस्थितीत असून, त्याने मंगळावर फिरुन आपले काम करण्यास सुरुवात केल्याचीही माहिती देशाच्या अवकाश संशोधन विभागाने शनिवारी दिली.
भारतीय प्रमाणवेळेनुसार हे रोव्हर सकाळी दहा वाजून ४० मिनिटांनी मंगळावर उतरले. हे रोव्हर सूर्यप्रकाशाच्या उर्जेवर चालते. चिनी अग्निदेवता 'झुरॉंग'चे नाव या रोव्हरला देण्यात आले आहे. गेल्या शनिवारीच या रोव्हरला मंगळावर नेणारे अवकाशयान मंगळावर उतरले होते. यानंतर हे रोव्हर जमीनीवर उतरवण्यासाठी आवश्यक त्या सर्व तपासण्या सुरू होत्या. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर अवकाशयान उतरवणारा चीन हा दुसराच देश ठरला आहे. हे रोव्हर मंगळावर ९० दिवस फिरणार आहे. या कालावधीमध्ये ते मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेईल.
अमेरिकाही आहे मंगळावर..
चीनसोबतच अमेरिकेचेही एक रोव्हर आणि लहानसे हेलिकॉप्टर मंगळावर दाखल आहे. हे रोव्हर जुलैमध्ये जीवसृष्टीचा पुरावा गोळा करेल, आणि २०३१ पर्यंत पुन्हा पृथ्वीवर परत येईल असा नासाचा मनसुबा आहे.
चीनच्या महत्त्वकांक्षी योजना..
अवकाश संशोधनाबाबत चीन सध्या मोठ्या योजनांवर काम करत आहे. काही अंतराळवीरांसह एक ऑर्बिटल स्टेशन अंतराळात सोडण्याच्या योजनेवर चीन सध्या काम करत आहे. यासोबतच, चंद्रावर मानव उतरवण्याच्या योजनेवरही काम सुरू आहे. २०१९मध्ये चंद्राच्या दुर्गम भागात एक स्पेस प्रोब लँड करणारा चीन पहिलाच देश ठरला होता. तसेच, १९७० नंतर पहिल्यांदाच गेल्या डिसेंबरमध्ये चीनने चंद्रावरील दगड पृथ्वीवर आणले होते.
हेही वाचा : इन्जेन्युईटीने पार केली मंगळावरील अतिथंड रात्र, सर्व उपकरणे शाबूत