नवी दिल्ली - ब्राम्होस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र फिलिपाईन्ससह इतर देशांना देण्याचा विचार भारत आणि रशिया करत असल्याची माहिती रशियाचे भारतातील दुतावास रोमान बाबुश्कीन यांनी दिली. ब्राम्होस क्षेपणास्त्र हे भारत आणि रशियाने संयुक्तरित्या तयार केले आहे. सध्या हे क्षेपणास्त्र फक्त भारत आणि रशियाकडे असून आता ते इतरही देशांना मिळणार आहे.
पुढील वर्षी करार होण्याची शक्यता
ब्राम्होस क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, हवेतून तसेच जमिनीवरून डागता येऊ शकते. पुढील वर्षाच्या सुरुवातील भारत आणि फिलिपाईन्समध्ये क्षेपणास्त्र पुरवठा करण्याचा करार होऊ शकतो, अशी शक्यता सुत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपूर्वी ब्राम्होस क्षेपणास्त्राच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या आहेत. नव्याने विकसीत करण्यात आलेले क्षेपणास्त्र आता ४०० किमीपर्यंत मारा करू शकते. पहिल्यांदा याची क्षमता फक्त २९० किमी होती.
मारक क्षमता वाढविण्यासाठी चाचण्या
'क्षेपणास्त्राच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. मारक क्षमता वाढविण्यासाठी नव्याने चाचण्या घेण्यात आल्या. आम्ही इतर देशांना आता क्षेपणास्त्र निर्यात करत असून फिलिपाईन्सपासून याची सुरुवात करत आहोत, असे बाबुश्किन यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले. निर्यातीसंबंधी भारताने फिलिपाईन्ससोबत प्राथमिक चर्चा केल्याचेही समोर आले आहे.