ढाका - बांग्लादेशच्या टेलिकम्युनिकेशन प्राधिकरणाने कॉक्स बझार येथील रोहिंग्या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये सेवा देणे थांबवण्याचे आदेश टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. मागील काही आठवड्यांत या कॅम्पसमध्ये घडलेल्या हिंसक घटना आणि गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे. या कॅम्पमध्ये जवळपास १० लाख रोहिंग्या निर्वासित राहतात.
हेही वाचा - काबूलमध्ये बॉम्बस्फोट; ५ ठार, तालिबानने स्वीकारली जबाबदारी
या कॅम्पमध्ये मोबाईल फोन ऑपरेटर्स तसेच, मोबाईलच्या सिम कार्डच्या विक्रेत्यांनाही येथे विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. बांग्लादेश टेलिकम्युनिकेशन नियमन आयोगाने (बीटीआरसी) हा आदेश जारी केला असून संबंधित कंपन्यांना यासंबंधी केल्या जाणाऱ्या कारवाईचा अहवाल ७ दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे. याविषयी स्थानिक माध्यमाने माहिती दिली आहे.
हेही वाचा - कुलभूषण जाधव यांना मिळणार कन्स्युलर अॅक्सेस, आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तान नरमला
७ लाखांहून अधिक रोहिंग्यांना म्यानमारमधील राखिने येथून स्थलांतरित होणे भाग पडले होते. २०१७ मध्ये झालेल्या तेथील क्रूर लष्करी कारवाईनंतर रोहिंग्या जीव वाचवण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळाले होते. म्यानमारमध्ये हा समाज अल्पसंख्य असून सध्या बांग्लादेशातील कॉक्स बझार येथील ३६ हून अधिक कॅम्पसमध्ये त्यांनी आसरा घेतला आहे. सध्या बांग्लादेशात आसरा घेतलेल्या रोहिंग्यांची संख्या १२ लाखांवर पोहोचली आहे.