सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेने कोरोनावरील लसीची चाचणी सुरू केली आहे. यासोबतच, कॉमनवेल्थ वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेने (सीएसआयआरओ) गुरूवारी जाहीर केले, की त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या जिलॉंगमध्ये प्राणी आरोग्य प्रयोगशाळेत कोरोनावरील लसीबाबतच्या चाचणीचा पहिला टप्पा पार पडला आहे.
या चाचण्या पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच या दोन्ही लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत की नाही याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
या चाचणीचा पहिला टप्पा पार पडला आहे. ही ऑस्ट्रेलियासाठी आणि जगासाठी मोठी गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियातील आणि जगभरातून आलेल्या संशोधकांनी दिवस रात्र एक करून केलेल्या अथक मेहनतीचे हे फळ आहे, असे मत सीएसआयआरओचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी मार्शल यांनी दिली. हा केवळ पहिला टप्पा आहे, जोपर्यंत या विषाणूवर संपूर्ण मात करणारी लस निर्माण होत नाही, तोपर्यंत आमचे संशोधक काम करत राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सीएसआयआरओने जानेवारीमध्येच या लसीवर संशोधन सुरू केले होते. तेव्हा या संशोधकांना प्रयोगशाळेमध्ये कोरोना विषाणू तयार करण्यात यश मिळाले होते. तीन महिन्यानंतर ही लस जरी सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झाली, तरी तिला जगभरात पोहोचण्यासाठी वर्ष ते दीड वर्ष लागू शकते, असा अंदाज या संस्थेने व्यक्त केला आहे.
हेही वाचा : कोरोनाला लढा देण्यासाठी रुग्णालयातील वाचनालयाला बनवले 'आयसीयू'!