जौझान - अफगाणिस्तानात तालिबानने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात १४ सैनिकांना प्राण गमवावे लागले. तालिबानी दहशतवाद्यांनी देशातील उत्तरेकडील जौझान येथील सुरक्षा तपासणी नाक्यावर हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात आणखी पाच जण जखमी झाले आहेत.
हल्ल्याला प्रत्युत्तर देताना अफगाण लष्कराने ७ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. तर, ३ दहशतवादी जखमी झाले, अशी माहिती येथील वृत्तसंस्थेने दिली आहे. मागील दोन दशकांपासून अफगाण सरकार तलिबानी दहशवादाविरोधात लढा देत आहे. मात्र, या सरकारचे प्रयत्न बरेचसे असफल ठरले असून येथे दहशतवाद्यांची 'पैदास' वाढतच आहे.
सध्या अफगाणिस्तानच्या भूमीवर अनेक घुसखोर आणि दहशतवादी गट आहेत. तसेच, अनेक नवनवीन तयार होत आहेत. यातील बहुतांशी गट अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांचीच पिलावळ आहेत आणि त्यांच्याशी संबंधित आहेत.