इस्लामाबाद - पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात फुटबॉलच्या मैदानाजवळ झालेल्या स्फोटात 2 जण ठार आणि 8 जखमी झाले.
प्रांताचे प्रवक्ते लियाकत शाहवानी यांनी सांगितले की, पाचगुर जिल्ह्यात हा स्फोट झाला. त्यावेळी दोन्ही संघांचे खेळाडू आणि प्रेक्षक सामन्यानंतर मैदानावर जात होते. ते म्हणाले की, जखमींमध्ये हायस्कूलमधील मुलेही आहेत, जी तेथे सामने खेळण्यासाठी आणि पाहण्यासाठी आली होती. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
हेही वाचा - हेल्मंड : रस्त्याकडेला झालेल्या बॉम्बस्फोटात अफगाण सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू
शाहवानी म्हणाले, 'दहशतवाद संपविण्याचा प्रांतिक सरकारचा संकल्प अशा भ्याड कृत्यांनी रोखता येणार नाही. हल्ल्यात सामील झालेल्यांना पकडून कायदेशीर कारवाई केली जाईल.'
मोटारसायकलवर आयईडी बॉम्ब लावून हा स्फोट घडवून आणल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. स्फोट इतका जोरदार होता की, त्यात 2 वाहनेही खराब झाली. घटनेचा तपास सुरू आहे.
आतापर्यंत कोणत्याही गटाने किंवा व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
हेही वाचा - मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकमधील सशस्त्र हल्ल्यात 3 संयुक्त राष्ट्र शांततासैनिक ठार, 2 जखमी