न्यूयॉर्क - एका व्यक्तिला दुसऱ्या व्यक्तीची किडनी बसवण्यात येते. मात्र, एखाद्या व्यक्तीला प्राण्याची किडनी बसवल्याचे तुम्ही कधी ऐकलं आहे. मात्र, असे घडले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील शल्यचिकित्सकांनी प्राण्याची किडनी मानवी शरीरामध्ये प्रत्यारोपण करण्यात यश मिळवलं आहे. शल्यचिकित्सकांनी यशस्वीरित्या माणसाला डुकराची किडनी बसवली आहे. वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल पडले आहे. ही डुकराची किडनी महिलेच्या शरीरामध्ये सामान्यपणे कार्य करत असल्याचे आढळले आहे.
अमेरिकेतील शास्त्रज्ञांना झेनोट्रान्सप्लांटेशन मध्ये मोठे यश मिळाले आहे. झेनोट्रान्सप्लांटेशन म्हणजे प्राण्यांच्या अवयवाचे मानवामध्ये प्रत्यारोपण करणे. एक प्रयोग म्हणून शास्त्रज्ञांनी डुकराची किडनी महिलेला बसवली. वैद्यकीय शास्त्रातील ही एक मोठी उपलब्धी मानली जाते. ज्या महिलेवर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. ती महिला ब्रेन डेड होती. महिलेची किडनी चांगल्याप्रकारे कार्य करत नव्हती. त्यामुळे महिलेला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. सध्या हा प्रयोग म्हणून केला गेला आहे आणि महिलेच्या कुटुंबीयांकडून यासाठी संमती घेण्यात आली होती.
मानवी शरीर डुकराच्या किडनीला बाह्य अवयव म्हणून नाकारू नये, म्हणून जेनेटिकली मॉडीफाय केलेल्या डुकराची किडनी या व्यक्तीला लावण्यात आली आहे. यापूर्वी आशा प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. मात्र, मानवावर अशी चाचणी झाली नव्हती. डुकरांचे अवयव मानवी अवयवांशी मिळते-जुळते असतात. अवयव प्रत्यारोपणासाठी डुकराचा वापर करणं ही काही अगदीच नवी कल्पना नाही. डुकरांच्या हृदयातील वॉल्व्हचा वापर पूर्वीपासूनच मानवांसाठी करण्यात आलेला आहे.
डुकराच्या जनुकांमध्ये बदल -
डुकराच्या जीन्समध्ये ग्लायकॉन नावाचा साखरेचा रेणू असतो, जो मानवांमध्ये नसतो. आपले शरीर या साखर रेणूला बाहेरचा घटक मानते आणि तो नाकारते. यामुळे याआधी जेव्हा-जेव्हा किडनी प्रत्यारोपणाचा प्रयत्न केला गेला. तेव्हा तो अयशस्वी झाला. या समस्येचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञांनी डुकराच्या जनुकांमध्ये बदल करून साखरेचा हा रेणू आधीच काढून टाकला होता. यासह, जनुकीय अभियांत्रिकीद्वारे डुकराच्या जनुकांमध्ये बदल करून किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले.
किडनी प्रत्यारोपण -
भारतात प्रत्यारोपणासाठी अवयवांची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार, भारतात दरवर्षी सुमारे 2 लाख लोकांना किडनी प्रत्यारोपणाची गरज असते. परंतु केवळ 6 हजार लोकांनाच किडनी मिळते. जर डुकरापासून माणसांना किडनी मिळाली. तर मागणी आणि पुरवठ्यामधील अंतर संपेल. यासोबतच किडनीशी संबंधित आजारांमुळे भारतात दरवर्षी सुमारे 2 लाख लोकांचा मृत्यू होतो. यापैकी 10-15% लोकांचे प्राण वेळेवर किडनी प्रत्यारोपण करून वाचवता येतात.