जिनिव्हा - जागतिक आरोग्य संस्थेने कोरोनाशी लढण्यासाठी दोन मोबाईल अॅप्स लाँच केली आहेत. याचा फायदा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांनाही होणार आहे.
यातील पहिले अॅप 'डब्ल्यूएचओ अकॅडमी' हे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबाबत या अॅपमध्ये माहिती दिली आहे. तर दुसरे अॅप ही अशाच प्रकारची माहिती सामान्य नागरिकांना देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
डब्ल्यूएचओ अकॅडमी या अॅपमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध होईल. त्यासंबंधी झालेले शोधनिबंध, जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत कोरोनाबाबत जाहीर केलेली माहिती, जी मिनिटा-मिनिटाला अपडेट होईल, कोरोना रुग्णांवर उपचार करताना काय काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण आदी सर्व माहिती या अॅपमध्ये असणार आहे. डब्ल्यूएचओचे डिरेक्टर जनरल डॉ. टेड्रोस घेब्रेसस यांनी याबाबत माहिती दिली.
यासोबतच या अॅपमध्ये जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या अपडेट होत राहील. हे दोन्ही अॅप्स मोफत असून, ते गुगलच्या प्लेस्टोर आणि अॅपलच्या अॅपस्टोरवर उपलब्ध आहेत.
हेही वाचा : लॉकडाऊनमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले, कारण ऐकून व्हाल थक्क