वॉशिंग्टन डी. सी - काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी दोन आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. एका अफगाण अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, या आत्मघातकी हल्ल्यात जवळपास 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 143 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये काही अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांसह काही लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी ISIS या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या घटनेचा अमेरिकेने निषेध व्यक्त केला आहे. हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शोधून काढण्यात येईल आणि त्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दशतवाद्यांना दिला आहे.
काबूल विमानतळावर हल्ल्यामागे ISIS-K चा हात आहे. हा हल्ला घडवणाऱ्या ISIS-K ला आणि अमेरिकेला नुकसान पोहचवण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना आम्ही विसरणार नाही आणि माफही करणार नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि शिक्षा देऊ असे बायडेन म्हणाले.
अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अजूनही सुरुच राहिल. अफगाणिस्तान असलेल्या अमेरिकन नागरिकांची आम्ही सुटका करू. आमचे मिशन सुरूच राहणार आहे. गरज पडल्यास आणखी सैन्य अफगाणिस्तानात पाठवण्यात येईल, असे बायडेन म्हणाले.
ज्याची भीती होती तेच घडलं..
अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दुतावासातून या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. काबुल विमानतळावर होणारी गर्दी पाहता दहशतवादी हल्ल्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. जेल तोडल्यानंतर बाहेर पडलेले अफगाणिस्तानच्या आयएसआयएसचे दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.
कधी झाला बॉम्बस्फोट -
काबुल विमानतळावर गुरुवारी सायंकाळी दोन ब़ॉम्बस्फोट झाले. पहिला ब़ॉम्बस्फोट विमानतळाच्या आत धावपट्टीजवळ झाला. आत्मघातकी हल्लेखोर लोकांच्या गर्दीत शिरला, तर दुसरा स्फोट हॉटेल बॅरनबाहेर झाला. हॉटेल बॅरन हे विमानतळाजवळ असून ब्रिटनचे सैनिक तेथे मुक्कामाला आहेत. ब़ॉम्बस्फोट झाल्यानंतर विमानतळाबाहेर प्रचंड गोंधळ झाला.
हेही वाचा - काबूल स्फोट : 60 जण ठार, ISIS-K ने दिली हल्ला केल्याची कबुली
हेही वाचा - काबूल विमानतळावर अव्वाच्या सव्वा दाम; पाण्याची बॉटल 1 हजार तर एक राईस प्लेट 7 हजार 500 रुपयांना