न्यूयार्क - गुंतवणूकदार व उद्योगपती वॉरन बफे यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. वॉरेन बफे यांनी बुधवारी यासंदर्भात निवेदन जारी केले. बर्याच वर्षांपासून मी संस्थेत निष्क्रिय राहिलो आहे. आता मी पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटलं. वॉरन बफे सध्या 90 वर्षाचे आहेत. तसेच 15 वर्षापूर्वी घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकत त्यांनी 4.1 बिलियन डॉलर्स धर्मादाय संस्थांना दान केले आहेत. वॉरेन बफे यांनी 99% संपत्ती दान करण्याची प्रतिज्ञा घेतली होती.
नुकतेच बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. फाउंडेशनमध्ये बिल हे अध्यक्ष तर मेलिंडा उपाध्यक्ष आहेत. एकमेकांपासून विभक्त होत असले तरी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसाठी एकत्रच काम करणार आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन ही जगातील सर्वात मोठी चॅरिटेबल फाऊंडेशन आहे. मात्र, दोघांच्या घटस्फोटानंतर संस्थेचे भविष्य अनिश्चित झाल्याचे बोलले जात आहे. राजीनामा देण्याचे कारण घटस्फोट असल्याचे बफे यांनी सांगितले नाही.
बफे यांनी बुधवारी गेट्स फाऊंडेशन आणि कौटुंबिक धर्मादाय संस्थांना 4.1 बिलियन डॉलर्स दान केले आहेत. 2006 मध्ये बफे यांनी आपली 99% संपत्ती मानवतेसाठी दान करणार असल्याची प्रतिज्ञा घेतली होती. त्यानंतर त्यांनी बर्कशायरचे शेअर्स दान केले होते. ज्यांची किंमत आता जवळपास 100 बिलियन डॉलर्स आहे. ओमाहा शहरामध्ये जन्मलेल्या बफे ह्यांनी वयाच्या 15व्या वर्षापासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. गर्भश्रीमंत असताना देखील आपल्या काटकसरी जीवनशैली व साधे राहणीमान जगणार्या बफे यांनी आपल्या संपत्तीचा काही भाग परोपकारी कामांसाठी दान केला आहे.
वॉरेन बफे बर्कशायर हॅथवे कंपनीचे संस्थापक -
गेट्स फाऊंडेशनची स्थापना सन 2000 मध्ये झाली होती. वॉरेन बफेच्या देणगीचा चौथा-पाचवा हिस्सा गेट्स फाऊंडेशनला गेला आहे. गेट्स फाऊंडेशनने पहिल्या दोन दशकांत गरीबी, रोग आणि असमानतेविरोधात लढा देण्यासाठी 54.8 बिलियन डॉलर डॉलर्स खर्च केले आहेत. वॉरन बफे यांनी आपले पैसे दान केले नसते. तर त्यांची संपत्ती अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या समतुल्य असती. जे फोर्ब्स मासिकाच्या म्हणण्यानुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. वॉरेन बफे बर्कशायर हॅथवे कंपनीचे संस्थापक आहेत. गुंतवणुकीच्या क्षेत्रात वॉरेन यांचा सल्ला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे वॉरेन बफे दरवर्षी कुठे गुंतवणूक करतात, याकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले असते.
हेही वाचा - बिल आणि मेलिंडा गेट्स घेणार घटस्फोट; २७ वर्षांचा होता संसार