वॉशिंग्टन – चीन आणि भारतामधील तणावाच्या स्थितीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे मध्यस्थ होण्याची इच्छा असल्याचे संकेत दिले आहेत. चीन आणि भारतामधील लोकांच्या शांतीसाठी सर्व शक्य ते प्रयत्न करण्याची ट्रम्प यांची इच्छा असल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले.
पूर्व लडाखमधील सीमारेषेवर तणावाची स्थिती असताना गेली काही आठवडे ट्रम्प प्रशासनाने भारताला चीनविरोधात सातत्याने पाठिंबा दिला आहे. भारत-चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये तणावाची स्थिती असल्याच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता ट्रम्प यांच्या प्रवक्त्याने उत्तर दिले आहे. भारतीय लोकांवर माझे प्रेम आहे, असे ट्रम्प यांनी म्हटल्याचे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव मॅकननी यांनी सांगितले. चीनमधील लोकांवर प्रेम आहे. दोन्ही देशांमधील लोकांच्या शांततेसाठी सर्व शक्य प्रयत्न करण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे.
व्हाईट हाऊसचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो यांनी भारत हा मोठा सहकारी देश असल्याचे नुकतेच म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खूप जवळचे मित्र असल्याचेही त्यांनी म्हटले.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ म्हणाले, की भारत हा अमेरिकेचा मोठा भागीदार आहे. सीमारेषेवरून असलेल्या वादाबाबत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आहे. चिनी दूरसंचार उत्पादनांच्या पायाभूत सुविधांबाबत असलेल्या धोक्यांबाबतही चर्चा केल्याची पॉम्पेओ यांनी बुधवारी माहिती दिली.
ट्रम्प हे जाहीरपणे भारताला पाठिंबा देतात. त्यांचे आम्ही स्वागत करतो, अशी ट्रम्प व्हिक्टरी इंडियन अमेरिकन फायनान्स कमिटीचे उपाध्यक्ष अल मॅसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.