वॉशिंग्टन डी.सी - गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता जगभरातील दिग्गजांचा पाठिंबा मिळू लागला आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची आणि व्यवसायाने वकिल असलेल्या मीना हॅरिस यांनींही शेतकरी आंदोलनावर टि्वट केले आहे.
जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर एका महिन्यांपूर्वी हल्ला झाला. आता जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशावर हल्ला होत आहे. हा काही योगायोग नाही. इंटरनेट शटडाऊन आणि भारतातील शेतकऱ्यांवर होणारा हिंसाचार पाहून आपल्याला संताप आला पाहिजे. याविरोधात आवाज उठवायला हवा, असे त्या म्हणाल्या.
ग्रेटा आणि रिहानाचा पाठिंबा -
आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. या टि्वटमध्ये आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत. रिहानाने 'आपण याबद्दल का बोलत नाही' असा प्रश्न विचारला होता. तसेच पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविला होता. शेतकरी आंदोलनकर्त्यांसोबत आम्ही एकजूटीने उभे आहोत, असे टि्वट तिने केले होते.
काय प्रकरण ?
सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला हिंसाचाराचे गालबोट लागले होते. त्यानंतर दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर आंदोलन करणाऱ्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद गेली गेली आहे. तसेच शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली आहे. या प्रकरणी अनेकांनी सरकारला सवाल केले असून शेतकरी आंदोलनला पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे.