वॉशिंग्टन - अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा जगात सर्वाधिक 20 हजार 604 वर जाऊन पोहोचला आहे. येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही बाब स्पष्ट झाली आहे. अमेरिकेने मृतांच्या आकड्याबाबत इटलीला मागे टाकले आहे. रविवारी सकाळपर्यंत इटलीमध्ये कोविड-19 मुळे 19 हजार 648 मृत्यूंची नोंद झाली. यामुळे अमेरिकेनंतर इटली जगात दुसऱ्या स्थानावर आहे.
याशिवाय अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडाही जगात सर्वाधिक पाच लाख 29 हजार 887 झाला आहे. तर स्पेन एक लाख 63 हजार सत्तावीस कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यासह जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापाठोपाठ इटलीमध्ये आत्तापर्यंत एक लाख 52 हजार 271 कोरोना संसर्ग झालेले रुग्ण सापडले असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सिस्टीम्स सायन्स अँड इंजिनिअरिंग (CSSE - सीएसएसई) विभागाने ही आकडेवारी जाहीर केली.
अमेरिकेत न्यूयॉर्क हे कोविड-19 चे केंद्रस्थान बनले असून येथे देशातील सर्वाधिक आठ हजार 627 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानंतर न्यू जर्सी आणि मिशिगन मध्ये अनुक्रमे दोन हजार 183 आणि एक हजार 276 मृत्यू झाले आहेत, असे सीएसएसई च्या अहवालात म्हटले आहे. तर, देशामध्ये 32 हजार एक रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने याआधी या महामारीमुळे अमेरिकेत एक लाख ते दोन लाख 40 हजार मृत्यू होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, या आठवड्यात त्यांनी हा आकडा कमी करत 60 हजार मृत्यू होऊ शकतात, असा अंदाज अहवालात व्यक्त केला आहे.
ट्रम्प यांनी ईस्टर संडेच्या दिवशी देशभरातील शाळा पुन्हा सुरू होतील; तसेच, व्यापारही सुरू होईल, असे म्हटले होते. मात्र, शुक्रवारी कोरोनासंबंधी कारवाई पथकाने माध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये हा विचार पुढील आठवड्यात ढकलला असल्याचे सांगितले.
रविवारपर्यंत जगभरात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख आठ हजार 862 वर पोहोचला आहे. तर, जगभरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 17 लाख 77 हजार 517 झाली आहे. तर, आतापर्यंत चार लाख चार हजार 236 लोक यातून बरे झाले आहेत.