वाशिंग्टन - संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने थैमान घातले असून सद्य परिस्थितीमध्ये कोरोनाचा सर्वांत जास्त प्रसार अमेरिकेमध्ये पसरला आहे. अमेरिकामध्ये एका दिवसात 2 हजारहून अधिक मृत्यू झाले असून न्युयॉर्क आणि न्युजर्सीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.
अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 2 हजार 108 लोक मरण पावले आहेत. एकूण मृत्यूचा आकडा 18 हजार 747 झाला आहे. तर 5 लाख 2 हजार 876 जण कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. .
न्यूयॉर्कमध्ये रोज 500 पेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. तुरुंगातील कैद्यांकडून आणि कंत्राटदारांकडून जमीन खोदून मृतदेहांना सामुहिकरित्या पुरले जात आहेत. त्याखालोखाल मिशिगन, कॅलिफोर्निया, लुयीशिना आणि पेन्सलवेनिया राज्यातही 20 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेने आत्तापर्यंत सर्वात जास्त कोरोना चाचण्या घेतल्या आहेत.
जगभरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोट्यवधी नागरिकांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. जागतिक व्यापार, पर्यटन, प्रवासी वाहतूक आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.